top of page
Search

Chandrayaan-3 Landing : अभिमानास्पद!

  • harshcartoonist
  • Aug 24, 2023
  • 2 min read

Chandrayaan-3 Landing : अभिमानास्पद! भारताचा 'चंद्रस्पर्श'... चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अभिमानास्पद! भारत चंद्रावर पोहोचला

भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.


भारताच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग

भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं यशस्वी लँडिंग केलं आहे. भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची शान चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलं आहे. 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.


इस्रोचं चांद्रयान चंद्राच्या कुशीत

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली भारताची चंद्रमोहिम यशस्वी ठरली आहे. प्रत्येक भारतीयाची छाती गर्व आणि अभिमानाने फुलून गेली आहे. चांद्रयान-2 मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारतानं हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्यो चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता यशस्वी उड्डाण केलं आणि आज या चांद्रयान-3 नं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आहे.


चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश

भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.

 
 
 

Comments


bottom of page